Rohini Khadse-Khewalkar : रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया..

पुण्यातील हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयाला पकडण्यात आलं आहे. खराडीतील एका फ्लॅटमध्ये ही रेव्ह पार्टी करण्यात येत होती. प्रांजल खेवलकर आणि प्रसिद्ध बुकी निखील पोपटा यांच्यासह ७ जणांना ताब्यात घेण्यात आलं.

हॉटेलमधून मद्य, हुक्का, हुक्क्याचे साहित्य, गांजा आणि कोकेनसदृश पदार्थ जप्त करण्यात आलं. याच दरम्यान पतीच्या अटकेवर शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी आता मौन सोडलं आहे.

रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरू पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल! जय महाराष्ट्र!” असं म्हणत रोहिणी यांनी आपल्या पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील स्टे बर्ड, अझुर सूट हॉटेलमधील ड्रग्ज पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी पहाटे कारवाई करत पाच पुरुषांसह दोन महिलांना अटक केली. या पार्टीचे आयोजन खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा नवरा प्रांजल खेवलकर याने केले होते.

एकनाथ खडसे यांनी देखील जावयाच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली. “सर्व रिपोर्ट आल्यानंतर यावर अधिक भाष्य करता येईल. अपुऱ्या माहितीच्या आधारावर भाष्य करणं हे चुकीचं होईल. त्यामुळे नंतर मी पत्रकार परिषद घेईन. तथ्य समोर येईल. यामध्ये जावई असो किंवा कोणीही असो जर दोषी असेल तर शासन झालंच पाहिजे. पण कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट येऊद्या. मला यावर अधिक भाष्य करायचं नाही” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

कोण आहे प्रांजल खेवलकर?

प्रांजल खेवलकर हा शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा पती आहे. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंब जळगावातील मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहे. खेवलकर याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याची चर्चा आहे.

आरोपी प्रांजल खेवलकर याच्यासह सातही आरोपींना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. खेवलकरच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयात सांगितलं की, आरोपीने अमली पदार्थाचे सेवन केलेलं नाही किंवा त्यांच्याकडे अमली पदार्थ मिळालेला नाही. द्वेषापोटी त्यांना गुन्ह्यामध्ये घेतलं आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या सात जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय प्रथमवर्ग सत्र न्यायाधीश एन. बी. बारी यांनी दिला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 28-07-2025