खेड : आव्हानात्मक परिस्थितीतवर मात करत कर्जी खाडीपट्ट्यातील वीजपुरवठा सुरळीत

रत्नागिरी : महावितरणच्या खेड विभागातील लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या कर्जी खाडीपट्टा या ठिकाणी वीजवाहिन्यांवरील असलेले ‘पिन व डिस्क इन्सुलेटर’ यांमध्ये मोठा बिघाड झाला होता. यामुळे खाडीपट्ट्यातील नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी गावे व वाडीवस्ती यांचा वीजपुरवठा खंडित होता; मात्र अतिशय जंगलमय भाग व सततचा कोसळणारा मुसळधार पाऊस अशा आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या ८ अधिकाऱ्यांनी व ४० कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ३६ तासांमध्ये या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.

सोमवार २१ जुलै सकाळच्या सुमारास सुमारे १९ गावे व वाड्यावस्त्या यांचा वीजपुरवठा वादळवारे व पाऊस यामुळे प्रभावित झाला. यामुळे सुमारे ८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला, कीं खाडीपट्टा हा जगबुडी नदीकिनारी वसलेला सखल भाग आहे. या भागात घनदाट जंगल व जगबुडी नदीच्या प्रवाहाबरोबर असणारे सखल भाग व सततचा पाऊस यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यास अनेक अडचणी येत होत्या; मात्र महावितरणच्या लोटे उपविभाग, खेड उपविभाग व विभागीय कार्यालय खेड यांमधील ८ अभियंते व सुमारे ४० जनमित्र व बाह्यस्रोत कर्मचारी यांच्या मदतीने सलग ३६ तास आव्हानात्मक परिस्थितीत अहोरात्र काम केले, त्यामुळे नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळये आदी खाडीपट्टा गावांमधील ३३ व ११ केव्ही वीजवाहिन्यांवरील खराब झालेले ११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलेले. त्या ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी ३९ किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११ केव्ही वाहिन्यांची लांबी ६० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. सर्वांनी सांघिक कामगिरी करून ही अवघड मोहीम यशस्वी करत ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवार २३ जुलैला सायंकाळी ४ वाजता पूर्ववत केला.

रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर, उपकार्यकारी अभियंते सचिन वेलणकर, दीपक सपकाळ, नीलेश नानोटे, साहाय्यक अभियंते समीर कदम, सिद्धार्थ पेटकर, रवी निकनवरे व कनिष्ठ अभियंता रोहन बडगुजर या सर्वांच्या टीमने ४० जनमित्र व बाहास्रोत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली.

११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलले
नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी खाडीपट्टा गावांमधील ३३ व ११ केव्ही वीजवाहिन्यांवरील खराब झालेले ११ पिन व डिस्क इन्सुलेटर बदलले. त्या ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी ३९ किलोमीटरपेक्षा जास्त असून, ११ केव्ही वाहिन्यांची लांबी ६० किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:56 AM 28/Jul/2025