चिपळूण-संगमेश्वरमधील ८० टक्के मतदान केंद्रांचे होणार व्हिडीओ शूटिंग

चिपळूण : विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ३३६ मतदान केंद्रे असून, या केंद्रांवर मतदान प्रक्रिया सीसीटीव्हीच्या कक्षेत होणार आहे. ८० टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांचे व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे, तर ५० टक्के मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण केले जाणार आहे, अशी माहिती येथील निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बुधवारी सायंकाळी प्रांत कार्यालयात त्यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघासंदर्भात आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ रोजी मतमोजणी होणार आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तयारी बहुतांश पूर्ण झाली असून, लवकरच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व अन्य यंत्रणा सज्ज

केली जाणार आहे. चिपळूण तालुक्यात १७० मतदान केंद्रे असून, संगमेश्वरमध्ये १६६ मतदान केंद्रे आहेत. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात आतापर्यंत २ लाख ७४ हजार ३६४ मतदार असून, महिला मतदारांची संख्या अधिक आहे. एक हजार पुरुषांमागे १०४५ महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्र सीसीटीव्हीद्वारे लाईव्ह प्रशासनाच्या निगराणीखाली असणार आहेत, तर ८० टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर व्हिडीओ शूटिंग केले जाणार आहे. दोन्ही तालुक्यांत ५५० दिव्यांग मतदार असून, त्यांचे घरातूनच मतदान घेतले जाणार आहे.

मतदान केंद्राच्या ठिकाणी गर्दी झाल्यास त्या ठिकाणी बाके व खुर्चांची व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रांची दुरूस्ती करण्यात आली असून लवकरच ती पूर्ण होईल. १९ ऑक्टोबरपर्यंत नवीन मतदार नाव नोंदविण्याची मुदत आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. तसेच ११२ या क्रमांकावर दूरध्वनी करून तक्रार करता येणार आहे. नुकतीच सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणी
चिपळूण शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये स्ट्राँग रूम असणार आहे. त्या ठिकाणी निवडणूक यंत्रणा सज्ज राहाणार आहे, तर याच शाळेतील गुरूदक्षिणा सभागृहात दि. २३ रोजी सकाळी ८ पासून मतमोजणी होणार आहे. २४ फेऱ्यांद्वारे ही मतमोजणी होईल. पोस्टलसाठी आठ टेबल, सैनिकांसाठी दोन टेबल असतील व उर्वरित टेबल मतदान यंत्रांसाठी ठेवण्यात येतील. २४ फेऱ्यांनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:37 PM 17/Oct/2024