संगमेश्वर : आरवली संगमेश्वर मार्गावर तात्पुरती मलमपट्टी केल्याचे अधिकाऱ्यांनी कबुली दिल्यानंतर आंदोलकांनी या रस्त्यावरील सर्व खड्डे दहा ते बारा दिवसांत तात्पुरत्या स्वरूपात भरा, अशी सूचना केली. तसेच आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे सांगितले; परंतु बांधकाम विभागाची अनागोंदी अशीच सुरू राहिली तर जनसामान्यांच्या सहकार्याने पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
संगमेश्वर पोलिसांत महामार्ग प्राधिकरण अधिकारी आणि महामार्गावरील समस्यांविषयी आंदोलन करणारे आंदोलक यांची बैठक झाली. यावेळी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी सर्वांना चर्चेसाठी आमने-सामने बसवले होते. चौपदरीकरणातील कामाची गुणवत्ता, सुरक्षेविषयीच्या उपाययोजना, अपघात क्षेत्रात फलक नसल्याने झालेले अपघात, शाळा व विद्यालयांच्या जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे, रहदारीच्या रस्त्यावर खोदून ठेवलेले खड्डे बुजवणे किंवा काम सुरू असल्यास बॅरिकेट लावणे, असे मुद्दे मांडण्यात आले. दगड-मातीची ओव्हर लोड वाहतूक करू नये, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला तो का? पण, जनसामान्यांना काहीच काम नाही म्हणून आपला वेळ खर्ची घालतात का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. प्रत्येक अधिकारी व्यक्तीने आपली जबाबदारी पार पाडली तर सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्यांचा पाढा वाचण्यासाठी आंदोलन उभे करावे लागणार नाही. आंदोलन झाले तर प्रशासनावर ताण पडणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. पण, कायम बेजबाबदारपणा, ढिसाळपणा यामुळेच त्रस्त झालेल्या नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. ही वेळ येऊ नये, असे सुनावण्यात आले.
… तर पाढा वाचावा लागणार नाही
संबंधित विभागाने जबाबदारी चोख पार पाडली तर जनतेला अधिकारी वर्गाची कर्तव्ये काय, याचा पाढा वाचावा लागणार नाही. दिलेल्या आश्वासनाची जाण ठेवून आरवली ते संगमेश्वर या मार्गावर रखडलेली दुरुस्ती सुरू करावी, खड्डेमय महामार्ग खड्डेमुक्त करून गणेशोत्सवात चाकरमान्यांना आणि रोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना आराम मिळावा, ही आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:11 PM 28/Jul/2025














