खेड : सिंधुदुर्ग मुंबई सिंधुदुर्ग अॅक्सिस कंट्रोल रोड बनत असून त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल. लोकांचा वेळ वाचेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. रविवारी खेड येथे स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण तसेच रामदास कदम यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी ना. शिंदे म्हणाले की, मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. रामदास भाई आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खर्या अर्थाने तुमचा स्वभाव, तुमचे जे काय बोलणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्यावरून मी नेहमी सांगतो की, रामदास भाई यांच्यात जितकी आग असेल, तितकीच माया त्यांच्या कृतीत असते रामदास भाई हे पक्के कोकणातले फणसासारखे आहेत. म्हणजे वरून काटेरी आणि आतून गर्यासारखे मऊ आणि गोड ही स्वभाव त्यांचा मी पाहिलेला आहे आणि त्यामुळे खर्या अर्थाने सगळी माणसं आपलीच आहेत. हे आपलं परिवार आहे आपला कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कोणी मोठा कोणी छोटा नाही. आपण सगळे एक आहोत. आपला उद्देश महाराष्ट्राला पुढे नेणे, बाळासाहेबांचे विचार पुढे नेणे, आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे नेणे हा आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अडीच वर्षांत पक्षाला 60 जागा विधानसभेमध्ये मिळणे हा जोक नाही. हा इतिहास आहे म्हणूनच लोकसभा, विधानसभेची पुनरावृत्ती करीत येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचा भगवा झेंडा फडकवून आपल्याला विरोधकांना दाखवायचे की, जनता जनार्दन कुणासोबत आहे. या राज्याचा विकास करणे, कोकणाचा विकास साधणे आणि या कोकणातला जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचे कामही आपण बर्यापैकी करीत करत आहोत.
दोन-चार रस्ते तर झाले. आता कोस्टल हायवे झाला की, पर्यटन संधी मिळेल. आज नऊ खाड्यांची आपण जोडणी करतोय. आज त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. आपण जो सिंधुदुर्ग मुंबई सिंधुदुर्ग अॅक्सिस कंट्रोल रोड जो करतोय त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल लोकांचा वेळ वाचेल. लोक येतील, उद्योग येतील, पर्यटन येईल, या ठिकाणी पर्यटनाला जालना मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल. आपला संकल्पच आहे की, या ठिकाणचा कर्ता पुरुष नोकरीसाठी गाव सोडून बाहेर जाता कामा नये. तो पुन्हा मुंबईत गेलेला माणूस पुन्हा आपल्या गावी आला पाहिजे. आपल्या आई-वडिलांची सेवा करत या ठिकाणी आपली शेतीवाडी केली पाहिजे, असे सांगत रामदास कदम यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभीष्टचिंतन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 28-07-2025














