चिपळूणची मातीच कसदार; मी केवळ निमित्त : मुख्याधिकारी विशाल भोसले यांचे भावनिक उद्‌गार

चिपळूण : चिपळूणची मातीच सकस आणि कसदार असून, मी केवळ निमित्तमात्र आहे. कोकणभूमीची मानसिक, बौद्धिक, कलात्मक साफसफाई करण्याचे काम ‘लोटिस्मा’ करते आहे. अशा संस्थेने नगरपालिकेचा गौरव केला ही गोष्ट आमच्यासाठी फारच अभिमानाची आणि जबाबदारी वाढवणारी आहे. यापुढेही नगरपालिकेकडून ‘लोटिस्माला सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे प्रतिपादन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले.

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात चिपळूण नगरपालिकेला राज्यात १४ व्या, तर देशात ८७ व्या मानांकनाने गौरविण्यात आले. चिपळूण नगरपालिकेच्या या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर घरडा केमिकल्स लोटे कंपनीचे साईट हेड आर. सी. कुलकर्णी, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फावडे, घमेलं, खराटा या सफाई अवजारांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर. सी. कुलकर्णी यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा आणि मुख्याधिकारी भोसले यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या वतीने आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना लोटिस्माच्या गुणग्राहकतेला धन्यवाद दिले.

याप्रसंगी बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर यांनी या उपक्रमाचे साक्षीदार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. आंबेडकर वाचनालय, अपरांत हॉस्पिटल, रोहिदास समाज सेवा संघ, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट चिपळूण या संस्थांतर्फे नगरपालिका व मुख्याधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी प्रकाश देशपांडे, बापू साडविलकर, राष्ट्रपाल सावंत, सुनील खेडेकर, समीर जानवलकर, सुरेश चिपळूणकर, अरुण इंगवले, रमण डांगे, संजय आलवे, अमित ओक, सुमेध करमरकर, प्रदीप पवार, प्राची जोशी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. यतिन जाधव, सूत्रसंचालन धीरज वाटेकर, मानपत्राचे वाचन मनीषा दामले, तर आभार प्रदर्शन विनायक ओक यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 28/Jul/2025