साडवली : शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू झाल्याने ठिकठिकाणची शिव मंदिरे गजबजू लागली आहेत. संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी शिवनामाचा गजर घुमणार आहे. एक दिवसीय असा अखंड दिवस-रात्र हा शिवनामाचा गजर सुरु असणार आहे. या कालावधीत मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.
श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो. त्यामुळे जे लोक श्रावण महिना भक्तीभावाने पाळतात ते या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शंकराची आराधना करून उपवास करतात. महिन्यात येणाऱ्या चार किंवा पाच सोमवारी शंकराची यथायोग्य पूजा करतात तसेच या कालावधीत प्रत्येक शिवमंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील मठधामापूर येथील सोमेश्वर मंदिरातही पहिल्या श्रावण सोमवारी शिवनामाचा एक्का होणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर, कर्णेश्वर या प्रमाणे मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर हे देवस्थान प्रसिद्ध आहे. सप्तलिंगीच्या तिरी वसलेल्या सात शिवलिंगा पैकी एक असे स्वयंभू असणारे हे शिवलिंग आहे. निसर्गरम्य परिसर आणि वारमाही वाहणारी नदी यामुळे परिसरात आनंददायी असे वातावरण असते. मंदिरापर्यंत पक्का रस्ता असल्याने भाविकांना याठिकाणी सहज जाता येते.
या मंदिरात वर्षभरात विविध कार्यक्रम होत असतात. यापैकी जानेवारीला मकरसंक्रांतीला होणारा शिव-पार्वती विवाह सोहळा हा या देवस्थानचा वर्षातील मोठा व वैशिष्ट्यपूर्ण असा उत्सव असतो. साक्षात परमेश्वराचा विवाह सोहळा पाहण्याची संधी भाविकांना यावेळी मिळते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 28/Jul/2025














