मालगुंड येथे श्रावणधारा मनामनातील उपक्रम उत्साहात संपन्न

◼️ शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण आणि खुल्या गटातील अनेकांनी केल्या कविता सादर

मालगुंड : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा – मालगुंड, कवी केशवसुत स्मारक मालगुंड आणि कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्ती दक्षिण कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने कवी केशवसुत स्मारक मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्रावणधारा मनामनातील हा काव्यसरींचा कार्यक्रम नुकताच उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

या कार्यक्रमात परिसरातील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुल्या गटांतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
या उपक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे माजी सैनिक रामचंद्र सावंत यांच्या शुभहस्ते आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करत देवी सरस्वती आणि कवी केशवसुत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

श्रावणधारा कार्यक्रमांमध्ये सहभागी कवीनी श्रावण, पाऊस, कारगिल विजय दिन, ऑपरेशन सिंदूर या विषयांवर आपापल्या कविता सादर करत कार्यक्रमाचा रसास्वाद वाढवला. यावर्षीच्या श्रावणधारा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे परिसरातील अनेक शाळा – हायस्कूलमधील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता, अत्यंत चांगल्या पद्धतीने सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विविध स्वरूपातील कविता सोप्या सध्या शब्दांत, गेय स्वरूपात आणि हावभाव करत सादर केल्याने उपस्थितांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली. त्यासोबतच कोकण मराठी साहित्य परिषद युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख अरुण मोर्ये, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंड युवाशक्ती प्रमुख अमेय धोपटकर, ज्येष्ठ सदस्या उज्जवला बापट यांनीही आपल्या कविता सादर करत उपक्रमाची व्याप्ती वाढविली. तसेच यादरम्यान कवी केशवसुत स्मारकाचे कोषाध्यक्ष रवींद्र मेहेंदळे यांनी भारतीय वर्षाच्या सहा ऋतुप्रमाणे कवी संमेलने व्हावीत, अशी सूचना केली. त्यांची हीच सूचना लगेचच मान्य करण्यात आली.

याच कार्यक्रमाच्या दरम्यान कारगिलविजय दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्यात अनेक वर्षे सेवा बजावलेले माजी सैनिक रामचंद्र सावंत यांच्या कार्यप्रति आदर राखत आणि त्यांच्या कार्यांना अभिवादन करण्यासाठी, यावेळी शाखा व स्मारक यांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान माजी सैनिक रामचंद्र सावंत यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कारगिल विजयाची माहिती दिली. तसेच नियमितपणे सैनिक कसे जगत असतात आणि त्यांच्यावर कसे विपरीत प्रसंग येत असतात मार्गदर्शन करून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालगुंड शाखेला व आयोजकांना धन्यवाद देऊन सैनिकाप्रति व त्यांच्या कार्याप्रति समर्पित भावनेने आदर राखण्याची गरज असल्याचे मत मांडले. तसेच याप्रसंगी समृद्धी गोणबरे व मिलिंद सुर्वे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल उपस्थितांच्या वतीने धन्यवाद देऊन कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या औचित्याने कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील हे पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला कवी केशवसुत स्मारक मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या अध्यक्षा नलिनी खेर, कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र मेहेंदळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. मोरेश्वर मुळ्ये, श्री. प्रभाकर बापट, पत्रकार वैभव पवार यांच्यासह शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक, कवी आणि साहित्यप्रेमी रसिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक आणि आभार कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी तर काव्यवाचनाचे निवेदन अरुण मोर्ये व अमेय धोपटकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालगुंडच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये, सचिव विलास राणे, सहसचिव रामानंद लिमये, युवाशक्ती दक्षिण कोकण विभाग प्रमुख अरुण मोर्ये यांनी परिसरातील शाळा, महाविद्यालयात जाऊन या उपक्रमासाठी प्राथमिक फेरी घेत सहभाग वाढविला. तर स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, अस्मिता दुर्गवळी, अदिती मांडवकर यांनीही विशेष प्रयत्न केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 28-07-2025