रत्नागिरी : केळये भीमोद्यान येथे ‘वर्षावास’ कार्यक्रम संपन्न

जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा केळये भीमोद्यान येथे जिल्हा संस्कार विभाग, रत्नागिरी तालुका शाखा आणि भीमोद्यान संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र परिवर्तन दिन आणि वर्षावास कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरणपंचशील ध्वजारोहण करून आणि बोधिवृक्षाला वंदन करून करण्यात आली.

त्यानंतर विहारातील विधिवत कार्यक्रम शाखेचे विद्यमान अध्यक्ष अनिल चवेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा संस्कार विभागाचे प्रमुख संजय कांबळे यांच्या उपस्थितीत झाले. वर्षावास कार्यक्रमाचे प्रवचनकार विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना आजच्या बौद्ध समाजातील युवक युवतींनी धम्म संस्कार पुढे नेण्यासाठी स्वतः संस्कारी होणे आवश्यक असल्याचे सांगून विविध संस्कार शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. संजय कांबळे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला प्रमुख प्रवचनकार विजय जाधव, संस्कार विभाग प्रमुख संजय कांबळे यांच्यासह भिमोद्यान संघटनेचे अध्यक्ष अनिल चवेकर, सचिव मनोज जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष अरुण पवार, पोलीस पाटील अशोक केळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव मनोज जाधव यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:44 PM 17/Oct/2024