चिपळूण : येथील मटण-मच्छी मार्केटमधील गाळ्यांची पुढील ३० वर्षांच्या कालावधीसाठी लिलाव प्रक्रिया लवकरच केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपूर्वी विक्रेत्यांची नगरपरिषदेत बैठक झाली होती. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार संबंधित इमारतीतील आवश्यक त्या सुविधा व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, इमारतीची दुरुस्ती अत्यंत घाईघाईने केली जात असल्याने ही वरवरची मलमपट्टी किती टिकणार, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
मटण-मच्छी मार्केटची ही इमारत साधारणपणे नऊ वर्षे जुनी आहे. ही इमारत गेल्या अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. इमारत वापरात आणण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी या इमारतीचे मूल्यांकन नगर परिषदेला प्राप्त झाले होते. त्यानुसार मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, त्याअगोदर संबंधित विक्रेत्यांची नगर परिषदेत बैठक घेण्यात आली. त्यावेळी ३० वर्षाच्या कालखंडासाठी ही इमारत लिलावाने देण्याचा धोरणात्मक निर्णय झाला होता. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी काही सूचनाही केल्या होत्या.
आता नगर परिषदेने या इमारतीच्या ढासळलेल्या बांधकामाच्या ठिकाणी प्लास्टर व इतर डागडुजीची कामे हाती घेतली आहेत. परंतु, प्रत्यक्षात स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दिलेल्या सूचनांप्रमाणे नूतनीकरण करण्याची मागणी केली जात आहे.
दर्शनी भागातील १ ते १५ गाळे व्यापारी संकुलासाठी आरक्षित. गाळ्याचे अधिमूल्य (ना-परतावा अनामत) – २,७१,८३८.५३ रुपये
मागील बाजूचे १ ते १० गाळे मच्छी व्यवसायासाठी आरक्षित गाळ्याचे अधिमूल्य २,१७,५३५.९० रुपये
मागील बाजूचे १ ते १८ गाळे मटण व्यवसायासाठी आरक्षित अधिमूल्य २,१७,५३५.९० रुपये
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 28/Jul/2025














