राजापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला अधूनमधून श्रावणसरी कोसळतच आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यात शिरसे येथील ग्रामस्थांच्या घरावर आंब्याचे झाड पडले. त्यामुळे घराच्या छपराचे नुकसान झाले आहे. तसेच एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी ४९.६८ मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड ५२, खेड ७१.५७, दापोली ५७.४२, चिपळूण ६०.८९, गुहागर २५.२०, संगमेश्वर ३५.९१, रत्नागिरी २६.४४, लांजा ५१.६०, राजापूर ६६.१२ मिमि नोंद झाली आहे. काल दिवसभर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत होता. वेगवान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून घरा-गोठ्यांचे नुकसान नोंदवले गेले. मात्र, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. दुपारी सूर्यदर्शनही झाले.
मागील पाच दिवसांपासून राजापूर तालुक्यात पावसाचा चांगलाच जोर होता. शिरसे येथील मंगेश शिर्सेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले. तसेच मंगेश शिर्सेकर यांच्या आईच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर भालावली खालचा भंडारवाडा येथे झाड पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्यामध्ये पडलेले झाड तोडून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. त्यामुळे सकाळी या रस्त्यावरील थांबलेली वाहतूक पूर्ववतपणे सुरू झाली. तसेच या ठिकाणी झाड पडून विजेचा खांबही पडला होता. त्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता. पाऊस कमी झाल्यामुळे राजापूर तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
दरम्यान, खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने जगबुडी नदीचे पाणी वाढल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर














