चिपळूण : ग्राहक अथवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता गावोगावी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मीटरविरोधात सरपंच संघटनेने एल्गार पुकारला आहे. महावितरण कंपनीने ठेकेदार एजन्सीमार्फत सुरू केलेली ही प्रक्रिया तातडीने थांबवावी यासाठी साखळी उपोषणाद्वारे आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील स्मार्ट वीज मीटर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी संघटनेचे तालुका अध्यक्ष व चिवेलीचे सरपंच योगेश शिर्के यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे स्मार्ट वीज मीटरला सरपंच संघटनेचा कडाडून विरोध असल्याचे कळविले होते. हे वीज मिटर बसविण्यासाठी ग्राहकाची कोणतीही संमत्ती घेतलेली नाही. ग्रामपंचायतीची परवानगी नाही. त्यामुळे हे काम थांबवावे, अशी मागणी केली होती. सरपंच संघटनेच्या कळंबस्ते येथील श्री काळेश्वरी कांचनी सभागृह येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही हा मुद्दा चांगलाच गाजला.
या बैठकीत महावितरण कंपनी व ठेकेदार एजन्सी यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून या स्मार्ट वीज मिटरच्या कामाविरोधात साखळी उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच त्याची दिशा ठरवली जाणार आहे.
या आंदोलनात आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांनाही निमंत्रित करण्याचे ठरले. तहसीलदार कार्यालय, वन विभाग, बीएसएनल टॉवर, जिल्हा परिषद सीईओ रत्नागिरी आदी विभागातील विविध विषयांवर व प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत मालघरचे सरपंच सुनिल वाजे, बिवली सरपंच नेहा वाजे यांची सदस्यपदी समितीत बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला सरपंच संघटना अध्यक्ष योगेश शिर्के यांच्यासह तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 29/Jul/2025














