चिपळूण : आमदार भास्कर जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नानंतर तब्बल २२ वर्षांनी तालुक्यातील शिरळ वैजी-भोम या मार्गांवर एस.टी.ची बसफेरी सुरू झाली. राज्य परिवहन महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी ८ वाजता सुटलेल्या या बसच्या मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले.
सुमारे २२ वर्षांपूर्वी या मार्गावर सुरू असलेली बससेवा अपेक्षित प्रवासी संख्या नसल्याने आणि मुख्य रस्त्याची दुरवस्था आदी कारणांमुळे चिपळूण आगाराने बंद केली होती. मात्र, या मार्गावरील रेहेळमधील ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय होत होती. विद्यार्थी आणि ग्रामस्थांना कामानिमित्त चिपळूणला येण्यासाठी ३ कि. मी.ची पायपीट करावी लागत होती.
दरम्यान, या रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण, रुंदीकरण झाल्यानंतर पुन्हा बससेवा सुरू व्हावी यासाठी बळीराम मोरे, शिवसेना विभागप्रमुख नितीन निकम, उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर, रेहेळ-वैजीचे सरपंच संदीप जाबरे, उपसरपंच रुपेश शेलार, भोमचे सरपंच मिलिंद शिर्के, शिरळ शाखाप्रमुख हेमंत मोरे, राजू मोरे यांनी आमदार भास्कर जाधव यांना निवेदन सादर केले. यानंतर ही बसफेरी सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी आगारातून सुटलेल्या पहिल्या फेरीचे वैजी येथे सुकाई, चंडीकाई देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त के. एस. मोरे, नितीन निकम, पोलिसपाटील सतीश मोरे, संतोष कांबळे, सरपंच श्रावणी मोहिते, सरपंच शशिकांत राऊत आदींसह ठिकठिकाणच्या थांब्यांवर संबंधित ग्रामस्थांनी स्वागत केले. तसेच चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 29/Jul/2025














