चिपळूण : शहरातील बसस्थानकाप्रमाणेच मध्यवर्ती महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवाजीनगर बसस्थानकातही चिपळूण आगारातर्फे एस. टी. पास सुविधा केंद्र सुरू केले आहे. यामुळे आता शिवाजीनगर बस्थानकात सर्व पास उपलब्ध होणार आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकातून सुटलेल्या मुंबई, पुणे, खेड, घाटमाथा, शिवाय स्थानिक दसपटी, अनारी, पोफळी आदी बस शिवाजी नगर बसस्थानकातून पुढे नियोजित मार्गावर धावत असल्याने हेही बसस्थानक प्रवाशांच्यादृष्टीने सोयीस्कर आहे. या बसस्थानकालगत महाविद्यालये, शाळा असल्याने सकाळपासून ते सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांची गर्दी असते. आगारातून विद्यार्थी पास
शाळा, महाविद्यालयात दिले जात असले तरी अन्य घटकांना पास घेण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात यावे लागत होते. यामध्ये संबंधित प्रवाशांचा बराचसा वेळ जात होता. असे असताना त्या प्रवाशांच्या सेवेसाठी आगार प्रशासनाने मध्यवर्ती बसस्थानकाप्रमाणेच शिवाजीनगर बसस्थानकातही पास सुविधा केंद्र सुरू केले आहे.
यात विद्यार्थी मासिक पास, मासिक व त्रैमासिक सर्व्हिस पास, आवडेल तेथे प्रवास व पास फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहेत. हे पास सुविधा केंद्र सकाळी ६.३० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत खुले राहणार आहे. तरी या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार प्रमुख दीपक चव्हाण यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 29/Jul/2025














