रत्नागिरी : मुंबई विद्यापीठात नुकतीच वार्षिक बृहत आराखडा सर्वसाधारण अधिसभेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सन २०२६-२७वर्षात मुंबई विद्यापीठात १७ नवीन महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दोन कौशल्यविकासाधारित दोन महाविद्यालयांचा समावेश आहे. रत्नागिरी शहरात एक तर दापोली उंबराळे व्हिलेज याठिकाणी एक महाविद्यालयास मंजुरी देण्यात आली आहे. कौशल्यविकास आधारित महाविद्यालय सुरू झाल्यास युवकांना रोजगार मिळण्यास चालना मिळणार, एवढं मात्र निश्चित.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत रत्नागिरी उपकेंद्र सुरू आहे. शहर, जिल्ह्यात विविध पारंपरिक, मेडिकल अशा महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, आतासर्वत्र कौशल्यविकास आधारित शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत असून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सर्वच विद्यापीठाने कौशल्यआधारित शिक्षण सुरू करावे, असे आवाहन केले होते. नुकतेच मुंबई विद्यापीठात अधिसभेची बैठक पार पडली. याबैठकीत १५ नवीन कौशल्यविकास आधारित महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी शहरात १, दापोली तालुक्यात १ अशा दोन प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ १, रायगड जिल्ह्यात अलिबाग शहर १, सासवणे, मांडवा १, पालघर जिल्ह्यातील सफाळे १, जव्हार १, वानगाव १ या महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. ही महाविद्यालये सुरू झाल्यास मुलांना कमी कालावधीत कोर्स पूर्ण करून शहरातच रोजगार मिळणार आहे.
सोलापूर विद्यापीठाचा पॅटर्न सर्वांनी घेण्याची गरज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मागील सहा वर्षापासून कौशल्य विकास आधारित १५० हून अधिक कोर्सेस सुरू आहेत. आतापर्यंत १२ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेवून कोर्स पूर्ण केला. त्यापैकी आतापर्यंत ८ हजार विद्यार्थी, विद्यार्थिनींना रोजगार मिळाला आहे. काहीजणांनी स्वताचा व्यवसाय सुरू केला. कौशल्य विकास कोर्समुळे विद्यापीठातील विद्यार्थी आत्मनिर्भर बनले आहे. सोलापूर विद्यापीठाचा पॅटर्न रत्नागिरीसह राज्यातील विविध विद्यापीठाने घेणे गरजेचे आहे. रत्नगिरी जिल्ह्यात ही रोजगार देणारे अनेक कोर्सेस होवू शकतात. पर्यटनाचा जिल्हा असल्यामुळे भाषा, पर्यटन कोर्स, यासह विविध कोर्सेस नवीन महाविद्यालयात सुरू केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
कौशल्यविकास आधारित महाविद्यालये सुरू झाल्यास नक्कीच फायदा होणार, लहान लहान कोर्सेस केल्यास रोजगार मिळेल किंवा स्वतःचा रोजगार ही टाकता येईल. पारंपरिकपेक्षा आता कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आहे. जेणेकरून रत्नागिरीतील तरुण येथे शिक्षण घेवून येथेच रोजगार मिळेल, त्यामुळे स्थांलतर ही थांबेल. –निखिल गायकवाड, विद्यार्थी
रत्नागिरीत दोन नवीन
कौशल्यविकास आधारित महाविद्यालयास मंजुरी मिळाल्याची अद्याप कोणते पत्रक आले नाही. त्यामुळे ठिकाण ही सांगता येत नाही. कौशल्यविकास आधारित कोर्सेस सुरू झाल्यास तरुणांना रोजगार मिळेल, छोटे छोटे आणि कमी किंमतीचे कोर्स सुरू होणे गरजेचे. कोकणातील रोजगाराच्या संधी ओळखून तशा प्रकारचे कोर्सेस सुरू व्हावेत, तशा प्रकारचे अभ्यासक्रमाची रचना होणे गरजेची आहे. –डॉ. किशोर सुखटणकर, प्रभारी उपसंचालक, रत्नागिरी उपकेंद्र
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:06 PM 29/Jul/2025














