रत्नागिरी : राज्यातील शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणि हे. आधुनिक उत्पादन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे ही अभिनव योजना सुरू केली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत. शेतकरी बंधू व भगिनींना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
राज्यातील उत्पादक शेतकऱ्यांना प्रगतिशील शेतीचा अनुभव घेण्यासाठी युरोप, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, इस्त्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया आदी देशांमध्ये निवडक अभ्यास दौऱ्यांवर पाठवण्यात येणार आहे.
या दौऱ्यांचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढवणे तसेच त्यांना जागतिक स्तरावरील शेतीत होणारे बदल समजावून घेणे हा आहे. योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदारांचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी २५ वर्षे पूर्ण असावे, कमाल वयाची अट नाही. लाभार्थी शेतकरी असावा स्व-उत्पन्नाचा चालू कालावधीचा सात-बारा व आठ अ उतारा आवश्यक शेतकऱ्यांचे मुख्य साधन शेती असावे व तसे स्वयंघोषणापत्रात नमूद करावे, शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे. शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए (चार्टड अकाऊंटंट), अभियंता, कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासकीय कोणत्याही विभागामार्फत, कृषी विद्यापीठांमार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत अर्थसाहाय्याने विदेशी दौरा केलेला नसावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 29/Jul/2025














