चिपळूण : मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका ते चिंचनाका या परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे पालिकेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष निर्मलाताई जाधव यांनी केली आहे.

पावसाळा सुरू असल्यामुळे रस्त्यात खूप खड्डे पडलेले आहेत. त्यात मोकाट गुरांची भर पडलेली आहे. पावसामध्ये वाहनचालकांना त्या मोकाट जनावरांचा त्रास होत आहे. काही वेळा अपघातही झालेले आहेत. शाळा, कॉलेज चालू झाली असून, मोकाट जनावरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. गुरे, कुत्री आडवी येऊन अपघात होतात.

काही दिवसांपूर्वी मोकाट जनावराने वृद्ध व्यक्तीला मारल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला पाहायला मिळाला होता. अशी घटना चिपळूण शहरात घडू नये, म्हणून चिपळूण पालिकेने दक्षता घेतली पाहिजे. नागरिकांची सुरक्षा करणे हे पालिकेचे काम आहे. पालिकेकडून घरपट्टी, पाणीपट्टी वसूल केली जाते. त्या तुलनेत पालिकेकडून सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी जाधव यांनी पालिकेकडे केली आहे.

ठोस कारवाईची मागणी
चिपळूण शहरातील बाहदूरशेख नाका ते चिंचनाका परिसरात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. अशा मोकाट जनावरांमुळे अपघाताचे धोके वाढले आहेत. नागरिकही भीतीच्या छायेत या रस्त्यावरून ये-जा करत आहेत. पालिकेने केवळ मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस, आवाहन करण्यापेक्षा ठोस आणि कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:26 PM 29/Jul/2025