राजापूर : सागरी महामार्गामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूरखाडी पूलावरून वाहनांची वर्दळ आणि रहदारी वाढली आहे. मात्र, या ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खाडी पुलावरील रस्त्याची पुरती वाताहत झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे नव्हे तर, खड्यात रस्ता’ अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांसह प्रवाशांवर आली असून, खड्यातून प्रवास करताना वाहनचालकांसह प्रवाशांचे कंबरडे मोडून जात आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील जैतापूर परिसरातून गेलेल्या सागरी महामार्गाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा जोडला गेला आहे. शॉर्टकट आणि कमी वेळ खाणाऱ्या या रस्त्याला वाहनचालकांकडून अधिक पसंती दिली जात असून, त्यातून या मार्गावरील गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कमालीची वाढली आहे, त्याचवेळी जैतापूर खाडीवरील पूल हा जैतापूर परिसरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन दळणावळणाचाही मुख्य दुवा आहे. त्यामुळे या जैतापूर खाडी पूल रस्त्याला प्रवासाच्यादृष्टीने विशेष महत्त्व आहे.
या महामार्गावरील जैतापूर खाडी पुलावर आणि पुढे तीव्र उताराच्या वळणावर रस्त्यामध्ये उंच आणि रुंद मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसागणिक या खड्यांमुळे रस्त्याची पुलाच्या भागामध्ये पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता हेच सर्वसामान्यांना कळेनासे झाले आहे. या खड्यातून धक्के खात प्रवास करावा लागत असल्याने वाहनचालकांसह प्रवाशांचे कंबरडे मोडून गेले आहे. तर दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे न बुजविले गेल्यास या खड्ड्यांतून मार्ग शोधित गणेशभक्तांना गणपती बाप्पाला आपल्या घरी आणावे लागणार आहे. जैतापूर खाडी पूल परिसरातील रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी जैतापूर परिसरातील सर्वसामान्यांसह प्रवाशांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 29/Jul/2025














