रत्नागिरी : श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताहातून नामगजर

रत्नागिरी : येथील राजीवडा भागातील प्राचीन श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये कालपासून हरिनाम सप्ताहाला उत्साहात व धार्मिक वातावरणात सुरुवात झाली. पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी रीघ लागली होती.

श्री काशीविश्वेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नामसप्ताह श्रावणी सोमवारी आयोजित केला जातो. दुपारी १२.१५ वाजल्यापासून नामसप्ताहाचा प्रारंभ झाला. यावेळी काशीविश्वेश्वराची पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आदी धार्मिक विधी झाले. त्यानंतर हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला. हाती वीणा घेऊन विणेकरी उभा असतो व दोन्ही बाजूंनी भजने म्हणणारे भाविक, भजनीबुवा, ढोलकी, मृदंगसाथ करणारे वादक हरिनामात तल्लीन होऊन जातात. प्रत्येक वाडीनुसार मंदिरात पारा लावला जातो. त्यानुसार भजनीबुवा विविध प्रकारची भजने आठवडाभर सादर करतात. या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होतात.

श्रावणानिमित्त ११ व १८ ऑगस्ट या तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी मंदिरात भजन कार्यक्रम सुरू राहणार आहे. १६ ऑगस्टला गोपाळकाला या दिवशी मंदिरात श्री सांबदेवाची पालखी सायंकाळी ६ वाजता श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर महादेवाच्या भेटीला येणार आहे. १८ ऑगस्टला चौथ्या सोमवारी श्री लक्ष्मीसहित श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभघ्यावा, असे आवाहन श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर देवस्थान समितीने केले आहे.

४ ऑगस्टला दिंडी सोहळा
पुढील सोमवारी ४ ऑगस्टला दुपारी १२.३० वा. पर्यंत नामगजर होणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा कार्यक्रम होणार असून, त्यामध्ये मांडवी येथील श्री देव भैरव आणि श्री स्वयंभू काशीविश्वेश्वर महादेव पालखी भेट सोहळा दिंडीच्या तिसऱ्या फेरीला होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:45 PM 29/Jul/2025