रत्नागिरी, [२९ जुलै, २०२५] : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर (२८ जुलै, २०२५ रोजी) मारूसागर सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असलेल्या भारत सरकारच्या वैज्ञानिक राजश्री व्ही.पी.एम. श्रीधरण यांचा १५,००० रुपये किमतीचा विवो मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेत ही चोरी केली असून, या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती
फिर्यादी राजश्री श्रीधरण (वय ३५, व्यवसाय वैज्ञानिक, राहणार भुवनेश्वर, ओडिसा) या २७ जुलै २०२५ रोजी रात्री अंदाजे १०.३० वाजता केरळ राज्यातील कोझिकोडे रेल्वे स्थानकाहून पनवेलकडे जाणाऱ्या १२९७७ मारूसागर सुपरफास्ट एक्सप्रेसच्या ए-२ कोचमधील सीट क्रमांक ५७ आणि ६० वर बसून प्रवास करत होत्या. २८ जुलै रोजी दुपारी २ ते ३.१० वाजण्याच्या सुमारास ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आली असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेतला. राजश्री यांच्या नकळत त्यांच्या सीटवरून त्यांचा निळ्या रंगाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेला.
चोरीस गेलेला ऐवज आणि पुढील कार्यवाही
चोरीस गेलेल्या मोबाईल फोनची अंदाजित किंमत १५,००० रुपये असून, त्यात VI आणि Airtel कंपनीचे सिमकार्ड होते. मोबाईलचा मॉडेल नंबर आणि IMEI नंबर सध्या उपलब्ध नाही. ही घटना पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी, गुन्हा रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या हद्दीत झाल्याने पनवेल येथून वर्ग होऊन रत्नागिरीत गुन्हा (गु.र.नं. ३३३/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
या घटनेमुळे रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासात आणि रेल्वे स्थानकांवर थांबलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. रेल्वे पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 29-07-2025














