चिपळूण : स्मशानभूमी संदर्भातील विविध कामे व सुविधांबाबत गेली ३८ वर्षे गोवळकोट-पेठमाप भागातील पाच बौद्धवाड्यांचा शासन व प्रशासनस्तरावर लढा सुरू आहे. मात्र अनेक वर्षे हा प्रश्न जैसे थे आहे. त्यामुळे आता संतप्त झालेल्या रहिवाशांनी स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी चिपळूण नगर परिषदेसमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गोवळकोट-पेठमाप समितीने स्मशानभूमी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनानुसार, चिपळूण शहरातील गोवळकोट-पेठमाप येथे बौद्ध समाजाच्या कदमवाडी, ताराचीवाडी, सुभेवाडी, गोवळकोट रोड, पेठमाप अशा पाच वाड्या पूर्वापार वास्तव्य करीत आहेत. या ठिकाणची स्मशानभूमी वाशिष्ठी नदीकाठी असून पावसाळ्यात नदीकडील भागात सातत्याने झीज होत असल्याने काही भाग नदीत वाहून गेला आहे. अतिवृष्टी काळातही या ठिकाणी मृतदेह दफन करणे अवघड बनते. यासंदर्भात आम्ही १९८८ पासून आतापर्यंत तत्कालीन जिल्हाधिकारी, विद्यमान आमदार शेखर निकम, चिपळूण तहसीलदार यांच्याबरोबरच चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र आमच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
स्मशानभूमीत मृतदेह दहन करण्यासाठी शेड उभारली आहे; मात्र त्यातही अनेक त्रुटी असल्याचे संबंधित विभागांच्या नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्यामुळे दि. १४ ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास गोवळकोट-पेठमाप येथील पाच बौद्धवाड्यांतील शेकडो रहिवासी स्वातंत्र्यदिनी सकाळी ९ वाजल्यापासून चिपळूण नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 29/Jul/2025














