रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेली ‘ती’ तरुणी महिना उलटूनही बेपत्ताच

रत्नागिरी : शहरातील रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉईंटवरुन आत्महत्या केलेल्या तरुणीचा एक महिना उलटूनही अद्याप शोध लागला नाही. सुखप्रित धालिवाल (२५, रा. नाशिक मूळ रा. हरियाणा) असे या तरुणीचे नाव आहे. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सुखप्रित हिने आत्महत्या केल्याचे पोलिसात नोंदविण्यात आले होते.

सुरुवातीच्या दिवसंत पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पोलीस, माऊंटेनिअर्सची टिम, एनडीआएफ यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र सर्व संसाधने वापरुनही या तरुणीचा शोध लागेला नाही. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

नाशिक येथे बँकेत नोकरीला असणारी सुखप्रित ही आपल्या मित्राला भेटण्यासाठी २९ जून रोजी रत्नागिरीत आली होती. यानंतर सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तिने आपले चप्पल आणि जॅकेट बाजूला ठेवले आणि रेलिंगच्या पुढे गेली. तसेच यानंतर तिने कठड्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच तिचे नातेवाईक रत्नागिरीत दाखल झाले होते. सुखप्रित हिच्या वडिलांनी याप्रकरणी संबंधित मित्राने माझ्या मुलीला फसविल्याच ठपका ठेवून त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सुखप्रित हिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप ती न सापडल्याने तपास कामात अडथळा निर्माण होत आहे. सुखप्रित ही नाशिक येथे वास्तव्यास असताना तिने चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने आपली व्यथा मांडली होती. दरम्यान पोलिसांकडून विविध मार्गाने शोध मोहीम राबविली होती. समुद्र किनारी भागात लक्ष ठेवण्यात येत होते. मात्र सुखप्रित हिच्याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:57 29-07-2025