रत्नागिरी: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या शंभराव्या वर्षात पदार्पण करत असून, या ऐतिहासिक निमित्ताने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसाठीची प्राथमिक फेरी २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी रत्नागिरी येथे होणार आहे. यामुळे कोकणातील हौशी आणि तरुण रंगकर्मींना आपले कलागुण सादर करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. स्पर्धेचे केंद्रप्रमुख म्हणून श्री. समीर इंदुरकर यांची, तर समन्वयक म्हणून डॉ. आनंद आंबेकर आणि श्री. सुनील बेंडखळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या संघांसाठी अंतिम फेरी १५ ते १८ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे होणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी जास्तीत जास्त एकांकिका संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. नाट्य परिषदेच्या शताब्दी वर्धापन दिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यापैकीच ही भव्य एकांकिका स्पर्धा तरुण आणि हौशी रंगकर्मींना एकत्र आणण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये नाट्यकला जोपासण्याची एक अंगभूत कला आहे. कलेमध्ये रमण्याची येथील मानसिकता पाहता, रत्नागिरी केंद्रावर एकांकिका स्पर्धांची चांगलीच रंगत येणार आहे. सर्व रंगकर्मी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
स्पर्धेशी संबंधित अधिक माहितीसाठी, समन्वयक डॉ. आनंद आंबेकर (मोबाईल क्र. ७०२०७३७४००) आणि श्री. सुनील बेंडखळे (मोबाईल क्र. ७७०९५९४९५९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रप्रमुख श्री. समीर इंदुलकर यांनी केले आहे.













