खंडाळा : केंद्र सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ या देशव्यापी अभियानाची खंडाळा येथे उत्साहात सांगता झाली. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावून पर्यावरणाच्या रक्षणाचा संकल्प केला, तसेच लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
या अभियानाची सुरुवात शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सभेत झाली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. माधव अंकलगे यांनी उपस्थितांना अभियानाचा उद्देश, इको क्लबचे महत्त्व आणि ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाची कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. या माहितीने अभियानाला एक योग्य दिशा मिळाली.
सभेपाठोपाठ शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शाळेने विद्यार्थ्यांना जनजागृतीपर बोर्ड दिले, ज्यावर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आईचे नाव लिहिले होते. या बोर्डांसह विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने झाडे लावली आणि त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आईच्या नावाशी पर्यावरणाची सांगड घालता आली, ज्यामुळे त्यांना भावनिक जोड मिळाली.
शाळेने दिलेल्या निर्देशानुसार, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपापल्या घरातील मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण केले. एक आठवडाभर चाललेल्या या अभियानात शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लावलेल्या झाडांचे फोटो ‘इको क्लब फॉर मिशन लाईफ’ या ठिकाणी अपलोड करण्यात आले. या यशस्वी सहभागाबद्दल सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. लावलेल्या सर्व झाडांचे संवर्धन करण्यावर शाळेचा भर राहणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
या उपक्रमाबद्दल बोलताना शाळा विकास समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अप्पा धनावडे यांनी सांगितले, “आजच्या वाढत्या प्रदूषण आणि बदलत्या पर्यावरणाच्या काळात विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.”
हा स्तुत्य उपक्रम रत्नागिरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार आणि केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि उपशिक्षक राधा नारायणरकर यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी केले.














