रत्नागिरी : श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमीनिमित्त मंगळवारी कोकणातील रत्नागिरी शहर, जिल्ह्यात महिला, तरुणींनी पारंपरिक पद्धतीने मातीच्या नागाच्या प्रतिकृतीची व गावात शेतातील वारुळाला दुर्वा, लाह्या, फुले आणि दूध अर्पण करून पूजा करण्यात आली. तसेच शहरातील विविध शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले.
नागपंचमी हा सण हिंदू संस्कृतीत नागदेवतांच्या पूजनासाठी साजरा केला जातो. यामागे अनेक पौराणिक कथा, धार्मिक श्रद्धा आणि पर्यावरणाशी संबंधित कारणे आहेत. जनमेजय आणि सर्पयज्ञ: राजा जनमेजयने वडिलांचा बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ सुरू केला होता. आस्तिक ऋषींनी यज्ञ थांबवला आणि नागवंशाचे रक्षण केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.
श्रीकृष्णाने यमुना नदीतील विषारी कालिया नागाचा पराभव केला. त्या दिवशी नागपूजेची परंपरा सुरू झाली असे मानले जाते. नागदेवता हे भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जातात. विष्णू भगवान शेषनागावर विश्रांती घेतात, त्यामुळे नागांना दैवी स्थान प्राप्त आहे. नागपंचमीला कालसर्प दोष दूर करण्यासाठी पूजा केली जाते. नागाची मातीची मूर्ती किंवा चित्र भिंतीवर काढून त्याची पूजा केली जाते. दूध, लाह्या, फुले, हळद-कुंकू अर्पण केले जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी उपवास करतात आणि नागाला भाऊ मानून पूजा करतात. पावसाळ्यात साप वारुळातून बाहेर पडतात. त्यांच्याशी सहजीवन राखण्यासाठी नागपंचमी साजरी केली जाते.
शेतकरी नागाला शेताचे रक्षक मानतात, कारण ते उंदीर खातात आणि पिकांचे नुकसान टाळतात. मंगळवारी जिल्ह्यात घरोघरी नागांची पूजा करण्यात आली. तसेच गावात महिलांनी वारुळाला दुर्वा, फुले, लाह्या, दही, दूध, आळूचे फतफते तसेच उकडीचे मोदक नैवेद्य दाखवण्यात आला. त्याचबरोबर घरोघरी पातोळ्या, गव्हाची खीर, आळूच्या वड्या बनवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात नागपंचमी साजरी करण्यात आली.
दर्शनासाठी शिवमंदिरात गर्दी
नागपंचमीनिमित्त महिला, तरुणीसह भक्तांनी जिल्ह्यातील राजीवडा, तृणबिदूकेश्वर, काळबादेवी, लोटेश्वर, संगमेश्वर येथील मार्लेश्वर मंदिर, सोमेश्वर मंदिर, भागेश्वर मंदिर, स्वयंभू सापतेश्वर मंदिर, वेळणेश्वर मंदिर यासह तालुक्यातील शिवमंदिरात मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी रांगाच रांगा दिसून आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 30/Jul/2025














