चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात ३३६ मतदान केंद्रे असून, २ लाख ७४ हजार ३३८ मतदार आहेत. निवडणूक काळात आदर्श आचासंहितेचे पालन होण्यासाठी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यात १२ भरारी पथके २४ तास कार्यरत राहणार आहेत. प्रमुख ५ ठिकाणी तपासणी केंद्रे असून, तेथेही वॉच राहणार आहे. ९० टक्के मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहणार असल्याची माहिती चिपळूण मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण विधानसभा निवडणुकीची माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी लिगाडे म्हणाले, या मतदार संघात ३३६ मतदान केंद्रे असून चिपळूण १७० आणि संगमेश्वर तालुक्यात १६६ केंद्रांचा समावेश आहे. या निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. त्यांची मतदार संख्या ५५०० इतकी आहे. निवडणूक काळात देखरेख करण्यासाठी १२ भरारी पथके २४ तास दोन्ही तालुक्यांत कार्यरत राहणार आहेत.
याशिवाय कुंभार्ली घाट, परशुराम घाट, गणेशखिंड, आरवली आदी ५ ठिकाणी तपासणी पथके २४ तास कार्यरत राहतील. निवडणूक कामकाजासाठी एकूण ३३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना अॅपवरून तक्रार नोंदवता येणार आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासून चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील १३२१ फलक, बॅनर हटवण्यात आले आहेत. २० नोहेंबरला मतदान झाल्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरूदक्षिणा सभागृहात २६ टेबलवर मतमोजणी होणार आहे. या वेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, मुख्याधिकारी विशाल भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 17/Oct/2024












