चिपळुणातील ‘त्या’ विक्रेत्यांना दोन दिवसांची मुदत

चिपळूण : गेल्या काही वर्षापासून येथील मच्छीमार्केटच्या इमारतीतील गाळ्यांचा काही विक्रेत्याकडून मच्छीविक्रीसाठी वापर सुरू आहे; मात्र आता या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने संबंधित विक्रेत्यांना गाळ्यातील साहित्य हटवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांची मुदत विक्रेत्यांना दिली आहे. गाळे खाली न केल्यास कारवाई करण्याची तयारी नगरपरिषदेने केली आहे.

येथील मच्छीमार्केट इमारत अनेक वर्षापासून पडीक असून, तिची दुरवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत या इमारतीची दुरुस्ती करून व्यापाऱ्यांसाठी ती खुली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या इमारतीच्या दर्शनीभागातील १५ गाळ्यांमध्ये काही विक्रेत्यांचे साहित्य ठेवण्यात आले आहे. गेली काही वर्षे या विक्रेत्यांकडून या गाळ्यांचा वापर केला जात आहे; मात्र आता या गाळ्यांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने तेथील साहित्य हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सोमवारी मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गाळे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला; मात्र काही विक्रेत्यांनी गाळे खाली करण्यासाठी मुदत मागितली.

या विषयी आमदार शेखर निकम यांच्याकडेही काही विक्रेत्यांनी मुदतीची मागणी केली. त्याप्रमाणे निकम यांनी दोन दिवसांची मुदत देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही संबंधित विक्रेत्यांनी गाळ्याचा ताबा न सोडल्यास गुरुवारनंतर नगर परिषदेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 30/Jul/2025