संगमेश्वरात ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम

संगमेश्वर : ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच्या ताणतणावातून विरंगुळा मिळावा, या हेतूने ज्येष्ठ नागरिक संगमेश्वर परिवारातर्फे पु. ल. देशपांडे यांच्या असा मी, असामी या पुस्तकावर आधारित भन्नाट विनोदकार सुबोध चितळे यांचा मनोरंजन बूस्टर हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांच्यासाठी एक तासाचा खुर्चीला खिळवून ठेवणारा हसता कार्यक्रम सादर करताना चितळे यांनी अनेक विनोद किस्से, कथा सांगत उपस्थितांना खळखळून हसवले.

संगमेश्वर येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी भेट दिली. त्यांनी उपस्थितांना डिजिटल, सायबर गुन्हे, व्हॉट्सअॅप व इतर फसवे मेसेज अशा निनावी येणाऱ्या फोनवरून मिळणाऱ्या मेसेजला अजिबात फसून जाऊ नका. तुमच्या आरोग्याची सदा काळजी घ्या. काही मदत लागली तर आपल्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा, असे आवाहन केले. या प्रसंगी नावडी संगमेश्वरचे उपसरपंच विवेक शेरे, व्यापारी दादा सैतवडेकर, दिलीप रहाटे, दादा कोळवणकर, माधवी भिडे, धामणीतील सुप्रसिद्ध व्याख्याते श्रीनिवास पेंडसे, जनार्दन शिरगावकर, विनायक पाथरे, बाबा प्रभावळे, विकास खातु, अविनाश चोचे, प्रकाश खातू, माजी अध्यक्ष भाऊ साळवी, दादा मुळ्ये, शुभांगी मुळ्ये आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह उदय संसारे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 17/Oct/2024