सावर्डे : महावितरण कंपनी स्मार्ट मीटरमुळे वीजबिले भरमसाठ येत असून, महावितरणकडून सुरक्षा अनामत रक्कमही वसूल केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी कुंभारखाणी बुद्रुक (ता. संगमेश्वर) येथील ग्रामस्थांनी आज (ता. ३०) सकाळी १२ वाजता ग्रामदेवता मंदिरात बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
महावितरणकडून गावागावांत आणि आसपासच्या परिसरात स्मार्ट मीटरची जोडणी केली जात आहे. जोडणी करताना परवानगी घेतलेली नाही, याबाबत पोलिस ठाणे आणि महावितरण कार्यालयात तक्रारही दिलेली आहे.
तरीही स्मार्ट मीटर बसवणे सुरूच आहे. त्यामुळे कुंभारखाणी येथे होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. महावितरणने वीजग्राहकांची परवानगी न घेता जुने मीटर काढून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत. ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली तरीही कंपनीचे कर्मचारी चोरून, लपवून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत. या बेकायदेशीर प्रक्रियेबाबत ग्रामस्थांच्या मनात अनेक गंभीर प्रश्न आणि चिंता निर्माण झाल्या आहेत. हे मीटर ज्यांची घरे बंद आहेत, ज्यांच्या घराच्या आवाराला कुलूप आहे, अशाच घरातील मीटर बदलले जात आहेत. याबाबत संबंधित महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 30/Jul/2025














