रत्नागिरी : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तीन महिने पगाराविना

रत्नागिरी : योजनांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. त्यामुळे अनेक विभागांच्या विकासकामांच्या निधीमध्ये मोठी कपात करण्याची वेळ सरकारवर आली आहे. अनेक खात्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील १०६ वैद्यकीय अधिकाऱ्यांनादेखील याचा फटका बसला आहे. गेल्या ३ महिन्यांपासून ते पगाराविना काम करत आहेत. श्वानदंशासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनसह औषधांचा अपुरा साठा असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ लागला आहे.

राज्याच्या तिजोरीत असलेला खडखडाट आरोग्य विभागाला होऊ लागला आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रातील १०६ वैद्यकीय अधिकारी गेल्या ३ महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. दरमहा ३५ लाख रुपये या अधिकाऱ्यांना वेतन देण्यासाठी आवश्यक असतात. गेले ३ महिने हे पैसे मिळालेले नाहीत.

एप्रिलपासून पगारच झालेला नाही. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यात औषधांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. श्वानदंश झाल्यास देण्यात येणाऱ्या इंजेक्शनचा साठा आता संपत आला आहे. श्वानदंश झाल्यास व्यक्तीला ५ इंजेक्शन्स घ्यावी लागतात. शहरी भागात श्वानदंशाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात १८ हजार ३१७ इतक्या व्यक्तींना श्वानदंश झाला. हा आकडा लक्षात घेता आरोग्य विभागाने इंजेक्शनचा पुरेसा साठा मागवला असला तरी तो अजून उपलब्ध झालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ६७आरोग्यकेंद्रे आहेत आणि जेमतेम १ हजार इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 30/Jul/2025