चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते भरण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. कोंढे-कुळेवाडी येथील रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. पावसाच्या सुरुवातीला हे खड्डे अगदी लहान होते, तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्यांकडे लक्ष दिले नाही. आता हे खड्डे मोठ्या आकाराचे झाले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे खड्डयांचा अंदाज येत नाही आणि लहान-मोठे अपघात होतात.
कोंढे येथे रस्त्याला लागूनच घर आहे. एखादा अपघात झाला, तर वाहने घरात शिरण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन ग्रामस्थांनी स्वखचनि खड्ड्यामध्ये दगडमाती टाकून ते बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही खड्डे पडतच आहेत. याबाबत येथील ग्रामस्थ संदीप कुळे म्हणाले, कोंढे येथील जुनी मराठी शाळा, एसटी थांबा येथेही खड्डे आहेत. त्याचा येथील स्थानिक ग्रामस्थांना त्रास होतो. याकडे संबंधितांनी लक्ष घालून वाहनचालकांबरोबरच ग्रामस्थांना भीतीमुक्त करावे.
खेर्डी ते टेरव हा मुख्य रस्ता खराब झालेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात या खड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे वाद होत आहेत. त्याचबरोबर अपघातांची संख्या वाढली असल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. रस्त्यावरील खड्डे न भरल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
खेर्डी-टेरव रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे. तेथे लोकांची नेहमी रहदारी असते. येथील रस्त्यावर मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले आहेत. त्यात पाणी साचलेले असते. शाळकरी मुले आणि ग्रामस्थ चालत जाताना बाजूने वाहून गेल्यास खड्यातील पाणी अंगावर उडते. यामध्ये वादविवाद होत आहेत. त्यामुळे या मार्गावरचे खड्डे लवकरात लवकर भरावेत-मंगेश पवार, शिवसेना शिंदे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 30/Jul/2025














