चिपळूण : तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे भातशेती व फळरोपांवर गोगलगायींचा मोठ्या प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान होत असून, शेतकरी, बागायतदार हैराण झाले आहेत. कृषी विभागाने यावर काहीतरी उपाययोजना सुचवावी, अशी मागणी येथील शेतकरी सुनील जंगम यांनी केली आहे.
अलीकडे गोगलगायींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. पिकावर तसेच घराच्या परिसरातील फुलझाडांवरही यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येत आहे. वेटोळा करून असलेल्या या गोगलगाय भातशेती, भाजीपाला रोपे, फूलझाडे यांची पाने खाऊन पीक नष्ट करत आहेत.
जिकडे तिकडे गोगलगायोंनी सगळे शेतच काबीज केले आहे. शेतकऱ्यांनी साध्या उपाययोजना करून पाहिल्या तरी या गोगलगायी पुन्हा नव्याने उत्पन्न झालेल्या पिकांची नासाडी करताना दिसून येत आहेत.
कृषी विभागाने सुचवलेले उपाय
नियंत्रणात्मक उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात तसेच प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड घट्ट बंद करावे.
गोगलगायी जमा करताना हातमोजे व तोंडावर मास्क घालावा. शेतात ७ ते ८ मीटर अंतरावर वाळलेले गवत किंवा भाजीपाल्याच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून ठेवावेत. त्या ठिकाणी आश्रयाला आलेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात नष्ट करावीत.
ओल्या गोणपाटावर कोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत. त्याकडे आकर्षित झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे. यामुळे गोगलगायी नष्ट होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 30/Jul/2025














