संगमेश्वर : बुरंबी-मुचरी-कळंबस्ते रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी-मुचरीमार्गे कळंबस्ते हा रस्ता तत्काळ दुरुस्त केल्यास देवरूख, विघ्रवली, वाशी, किंजळे, सोनवडे, मुचरी, कळंबस्तेमार्ग धामणी किंवा तुरळ येथे सरळ मुंबई-गोवा महामार्गाला जोडला जाईल. पर्यायी मार्गाचा उपयोग वाहतूककोंडी टाळण्यासाठी होऊ शकतो. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने पाहावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तालुक्यातील बुरंबी-मुचरीमार्गे कळंबस्ते हा रस्ता सुमारे ३० ते ४० वर्षे जुना आहे. सध्या मुचरी-गवळवाडी ते कळंबस्ते हा सुमारे २.५० ते ३ किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. पूर्ण रस्ता उखडला असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती झाल्यास मुंबई महामार्गाला जोडणारा पर्यायी रस्ता होणार आहे. या रस्त्यावरील मुचरी गवळवाडी ते कळंबस्ते हा भाग सुमारे २.५० ते ३ कि.मी. दुर्लक्षित असून, वाहतुकीस योग्य नाही. बांधकाम विभागाने लक्ष दिल्यास संगमेश्वर शास्त्रीपूल ते तुरळ महामार्गावरील ये-जा करणाऱ्या वाहनांना आणि गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना पर्यायी मार्ग तयार होईल.

देवरुखवरून जाणारा वाहनधारक संगमेश्वर ते शास्त्रीपूल येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी या मार्गाचा वापर करून कसबा, फणसवणे, नायरी, निवळी, शृंगारपूर, तांबेडी, चिखली, कडवई, तुरळ येथून महामार्गापर्यंत जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होईल. फणसवणे, अंत्रवली, गौळवाडी, शेम्बवणे करून धामणी गोळवली येथे बाहेर पडून मुंबई-गोवा महामार्गाला जाता येईल. गणपतीपूर्वी मुचरी गवळवाडी दत्तमंदिर ते कळंबस्ते या रस्त्याच्या भागाची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

जागोजागी खड्डेच खड्डे
सध्या मुचरी-गवळवाडी ते कळंबस्ते हा सुमारे २.५० ते ३ किलोमीटरचा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे. पूर्ण रस्ता उखडला असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्या रस्त्यावरून वाहन चालवणे तर सोडाच साधे पायी चालणेही कठीण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 30/Jul/2025