ओबीसींना पाच पैकी दोन जागांवर संधी द्या : सहदेव बेटकर

◾ समाजावरच राजकीय गणिते अवलंबून

चिपळूण : बहुजन ओबीसी समाजाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येत आहे. कोणताही पक्ष निवडणुकीत बहुजन ओबीसी समाजाला उमेदवारी देत नाही फक्त राजकारणात त्यांचा वापर करून घेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुजन ओबीसी समाजात ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपैकी दोन विधानसभा मतदार संघात ओबीसी समाजाचे उमेदवार द्या, असे जिल्हा परिषद माजी शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर यांनी सांगितले.

चिपळूण येथे पत्रकारांबरोबर बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात गेली अनेक वर्षे ओबीसी उमेदवार होते. त्या वेळी कोणत्याही सेवासुविधा नव्हत्या तरीही ओबीसी उमेदवार निवडून आले होते; मात्र बदलत्या काळानुसार सेवासुविधा वाढल्या, शिक्षणाची दारे खुली झाली; पण समाज राजकीय पटलावर दिसत नाही. बहुजन ओबीसी समाजाला फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सदस्यपदासाठी उमेदवारी दिली तर दिली अशीच स्थिती आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघांत उमेदवार दिले जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने बहुजन ओबीसी समाज आहे. या समाजाला पाच विधानसभांपैकी किमान दोन विधानसभेत तरी महाविकास आघाडी अथवा महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळावी अन्यथा मतदार राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवू द्यावी लागेल.

नेत्यांकडून जनतेची दिशाभूल

बहुजन ओबीसी समाजातील महिलांना सध्या देवदर्शन आणि साड्यांचे वाटप यात गुंतवून ठेवत आहेत. त्यामधून मतांची गणिते जुळवण्याचा प्रयत्न सुरू आहे; परंतु, महिलांना साड्या देऊन त्यांचा संसार फुलणार नाही. हा नुसता दिखावा असून नेते जनतेची दिशाभूल करत आहेत, असे बेटकर यांनी ठणकावले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:51 17-10-2024