राजापूर : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध राजकीय पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात जबरदस्त वातावरण निर्माण झाले असून, संभाव्य उमेदवारांमध्ये ‘कांटे की टक्कर’ सुरू आहे. दिवसागणिक इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर तळ कोकणातील राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुकांची संख्या वाढत आहे. हा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच नाही, तर या दोन्ही आघाड्यांच्या मित्रपक्षातदेखील जोरदार चुरस सुरू असून, या मतदारसंघातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच राजापूर लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघ संभाव्य उमेदवार कोण असणार, यावरून चर्चेत राहिला आहे. विद्यमान आ. राजन साळवी हे पुन्हा इच्छुक असले, तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा पुन्हा एकदा रेटून धरण्यात आला आहे. त्या पक्षाकडून माजी जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग उपळकर, विधानसभा संपर्कप्रमुख अॅड. चंद्रप्रकाश नकाशे आदी इच्छुक आहेत.
दुसरीकडे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसची ताकद असल्याने मविआमधून काँग्रेसने येथून शड्डू ठोकले आहे. कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष अविनाश लाड जोरदार इच्छुक आहेत. यापूर्वी या मतदारसंघात त्यांनी जोरदार बॅनरबाजी करून आपल्या उमेदवारीचे संकेत दिले होते. काँग्रेसमध्ये माजी विधान परिषद सदस्य अॅड. हुस्नबानू खलिफे देखील जोरदार इच्छुक आहेत.
लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ मिळावा म्हणून शिवसेनेकडून (शिंदे सेना) जोरदार लॉबिंग करण्यात आले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत महायुतीतून लढण्यासाठी जोरदार प्रयत्नशील होते. मात्र, महायुतीच्या अंतर्गत स्पर्धेतून भाजपाने बाजी मारीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ पारड्यात पाडून घेतला आणि तेथून नारायण राणे यांनी विजयदेखील मिळवित कोकणात कमळ फुलविले होते, लोकसभेला संधी हुकल्यानंतर किरण सामंत यांनी राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रित केले असून, गेले वर्षभर त्यांच्या समवेत त्यांची कन्या अपूर्वा सामंत यांनी शिवसेनेसाठी या विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी करताना विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाचे सोहळे करून घेतले आहेत.
उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी देखील आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे या संघात दौरे वाढविताना विकासकामांची भूमिपूजने आणि उद्घाटने यांचा धडाका लावल्याने या मतदारसंघावर शिवसेनेने आपला दावा मजबूत केल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ५३ हजार मतांमुळे या मतदारसंघात पक्षाची ताकद वाढलेली असल्याने हा विधानसभा मतदारसंघ भाजपलाच मिळावा, अशी जोरदार मागणी भाजपच्या नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकत्यांकडून सातत्याने केली जात आहे. महायुतीमधील तिसरा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते अजित यशवंतराव हे येथून लढण्यासाठी इच्छुक आहेत.
अंतिम उमेदवाराबाबत उत्सुकता
राजापूर, लांजा, साखरपा या विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मोठी लढत होणार असली तरी दोघांच्यातील अंतर्गत संघर्ष पाहता अखेरच्या क्षणी कोण बाजी मारणार, मविजा आणि महायुतीमधून हा विधानसभा मतदारसंघ कोणाला सोडला जाणार आणि येथून अंतिम उमेदवार कोण असणार, त्याची जोरदार उत्सुकता मतदारसंघातील जनतेला लागून राहिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:09 PM 17/Oct/2024












