चिपळूण : मिरजोळी- उक्ताड रस्ता बनलाय जीवघेणा; दुचाकी अपघातात महिला गंभीर जखमी

चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरील मिरजोळी ते उक्ताड दरम्यानच्या रस्त्यावर पुन्हा जीवघेण्या खड्यांनी आपले डोके वर काढले आहे. पाणी साचल्यामुळे खड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, हा परिसर सध्या अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरू लागला आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मिरजोळी येथील हारे कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सातत्याने या भागात अपघात घडूनही रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याने रिक्षा व्यावसायिकांसह स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत खड्डेन बुजविले गेल्यास रास्ता रोको करण्यासह खड्यांत वृक्षारोपण करण्याची आक्रमक भूमिका वाहनधारकांनी घेतली आहे.

मिरजोळी ते उक्ताड मार्गावर कमालीचे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात दरवर्षी या भागात रस्त्यावरून नदी वाहते. मिरजोळीचे सरपंच, दिव्यांगांची संघटना, शिवसेना उबाठा पक्ष, रिक्षा संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी उक्ताड भागात रस्त्यालगत गटाराचे काम हाती घेण्यात आले. मात्र, हे कामही अर्धवट स्थितीत राहिल्याने नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता पुरता खड्डेमय झाला आहे.

मोठ-मोठे खड्डे वाहनधारकांसह प्रवाशांचे कंबरडे मोडत आहे. मिरजोळी अजिंक्य पेट्रोल पंपसमोरही अशीच अवस्था आहे. येथे तर गटारच नसल्याने पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या दोन्ही भागातील जीवघेण्या खड्यांमुळे सातत्याने दुचाकींचे अपघात घडत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे अधिकारी यांना येथील परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे दिसत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 31/Jul/2025