रत्नागिरी, ३१ जुलै : रत्नागिरी तालुक्यातील आगवे गावामध्ये BSNL कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी आणलेले सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल आणि प्लेट्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी २८ जुलै ते २९ जुलै २०२५ दरम्यान आगवे-कावला आंबा येथील सरपंच रमेश गणाजी मालप यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये घडली असून, याबाबतची तक्रार ३० जुलै रोजी रात्री रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाकादेवी बाजारपेठ येथील रहिवासी नवाजिश फरमद अली (वय ३५, मूळ रा. चंदौरा सिवल, मेरठ, उत्तरप्रदेश) हे आगवे येथे BSNL टॉवर बसवण्याचे काम करत आहेत. या कामासाठी लागणारे लोखंडी अँगल आणि प्लेट्स (सुमारे ९०२ किलो वजनाचे) त्यांनी आगवे-कावला आंबा येथील सरपंच रमेश गणाजी मालप यांच्या जागेत मोकळ्यावर ठेवले होते.
नवाजिश फरमद अली हे २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कामाचे साहित्य घेण्यासाठी गेले असता, त्यांना तेथे ठेवलेला सर्व मुद्देमाल गायब झाल्याचे आढळले. कोणीतरी अज्ञात चोरट्याने हे साहित्य चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी त्यांनी तात्काळ रत्नागिरी ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला.
या घटनेची गंभीर दखल घेत रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी नवाजिश फरमद अली यांच्या तक्रारीवरून गु.र.नं. १४९/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. ग्रामीण भागात घडलेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 31/Jul/2025












