रत्नागिरी : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे स्वतःचा ग्रंथसंग्रह जपणारे विद्वान होते. ज्ञानाच्या विविध क्षेत्रांची सफर करत असताना आपल्याला विविध विषयांची पुस्तकेच आधार देतात. विद्यार्थी जीवन हे ज्ञान संपादन करण्यासाठी खूपच पूरक आहे. आजचा दिवस हा वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी विशेष अशाप्रकारचा आहे. असे प्रतिपादन गोगटे जोगळेकर महाविद्याल्याचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
महाविद्यालयाच्या (कै.) बाबूराव जोशी ग्रंथालयातर्फे भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. साखळकर बोलत होते. डॉ. कलाम यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील विशेष अभिरूची लक्षात घेऊन या विषयावर आधारित ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे डॉ. साखळकर यांनी केले.
या वेळी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संस्कृत विभागप्रमुख आणि ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. आनंद आंबेकर, प्रा. बाबासाहेब सुतार, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर आणि ग्रंथपाल किरण धांडोरे प्रमुख उपस्थित होते. वाचनाला प्रेरणा देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. प्रास्ताविकामध्ये ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी महाविद्यालयीन ग्रंथालय आणि उपलब्ध वाचनसाहित्य तसेच सोयी-सुविधा यांची सविस्तर माहिती दिली.
वाचन आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर महाविद्यालयातील परफॉर्मिंग आर्टस् विभागाचे प्रमुख डॉ. आनंद आंबेकर म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. डिजिटल युगात वाचन करणे जास्त आव्हानात्मक झाले आहे. वाचक गटाच्या ओंकार आठवलेने सूत्रसंचालन केले. सहायक ग्रंथपाल उत्पत वाकडे यांनी आभार मानले.
ग्रंथ अभिवाचन
ग्रंथालयाच्या वाचक गटाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ अभिवाचन केले. यात डॉ. कलाम यांचे अग्नीपंख या ग्रंथाचे अभिवाचन ओंकार आठवले, जे. आर. डी. टाटा यांची पत्रे या ग्रंथाचे चैतन्य पटवर्धन, कथारंग या ग्रंथाचे वृषाली कोवळे, इनर मॅजिक या ग्रंथाचे सिद्धी साखळकर, पिंजऱ्यातले सुख या ग्रंथाचे पायल जाधव, ज्याचा त्याचा परीघ या ग्रंथाचे वैष्णवी श्रीनाथ आणि प्राचीन भारताचा इतिहास या ग्रंथाचे चारूदत्त भडसावळे याने अभिवाचन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:23 PM 17/Oct/2024









