देवरुख : आदिवासी पाड्यापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने मोबाईल मेडिकल युनिट (फिरता दवाखाना) ही योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वाडी वस्तीमध्ये वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याची किमया साधण्यात आली. याचा लाभ दीड महिन्यामध्ये १ हजार ३८४ रुग्णांनी घेतला.
आदिवासी समाज वैद्यकीय उपचाराअभावी मृत्युमुखी पडतो. याचीच जाणीव ठेवून केंद्र सरकारने फिरता दवाखाना ही योजना सुरू केली. याअंतर्गत संगमेश्वर तालुक्यालाही फिरता दवाखाना व्हॅन प्राप्त झाली. या दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. प्रणिता खाडे, औषध निर्माण अधिकारी म्हणून जुही नरोटे व व्हॅनचे चालक म्हणून मिथुन रेवणे काम पाहत आहेत. हा फिरता दवाखाना संगमेश्वर तालुक्याला २ जून रोजी प्राप्त झाला. तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे, कोंड असुर्डे व तेर्ये अशा गावांची दुर्गम व कातकरी पाडा गाव म्हणून निवड करण्यात आली.
या निवड झालेल्या गावांबरोबरच तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वाडीवस्त्यांमध्ये प्रत्यक्ष हा दवाखाना फिरून रुग्णांची तपासणी व औषधोपचार केला जात आहे. तालुक्यामध्ये कातकरी समाज हा अत्यंत दुर्गम अशाठिकाणी वसलेला आहे. आजपर्यंत या समाजातील १८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण तालुक्यातील १ हजार ३८४ रुग्णांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. आजार बळावलेला असलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र वा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तपासणीतून आजवर कमी रक्त शरीरात असलेले ४ रुग्ण मिळाले आहेत. याचबरोबर एक महिला गर्भधारणा झालेली महिला मिळाली. या सर्वांवर योग्य ते वैद्यकीय उपचार या दवाखान्यामार्फत करण्यात आले.
या फिरत्या दवाखान्यातील समूहाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. याचबरोबर ११ प्रा. आ. केंद्रे, २२ उपकेंद्रे यातील कर्मचारी, ५० गावांमधील पोलीस पाटील, सरपंच, आरोग्य कर्मचारी, आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस, गावांमधील विविध मंडळे यांचे सहकार्य लाभत असल्याचे समूहाने नमूद केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 31/Jul/2025












