दापोली : दाभिळ, पोफळवणेतील दुर्गम भागात बीएसएनएल सेवेचे ‘नो नेटवर्क’

दापोली : दापोली तालुक्यातील दुर्गम भागात बीएसएनएल कंपनी मोबाईल सेवा देण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे ग्राहक कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करत आहेत. कंपनीने उभारलेले मोबाईल टॉवर फक्त शोभेसाठीच आहेत का? अशी प्रतिक्रिया ग्राहकांकडून उमटत आहे.

तालुक्यातील दाभिळ, पोफळवणे ही गावे दुर्गम भागात आहेत. अशा ठिकाणी फक्त बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येतो. मात्र, या दोन्ही गावात गेले महिनाभर नेटवर्क नाही. त्यामुळे येथील लोकांना संपर्क करणे कठीण होत आहे. मोबाईल रिचार्ज फुकट जात आहेत. येथील नागरिक वारंवार तक्रारी करूनही कंपनी अधिकारी लक्ष देत नाहीत. दुर्गम भाग असल्याने वाहनाच्या सोयीसुविधादेखील कमी आहेत. अशावेळी एखाद्या नागरिकास वैद्यकीय मदत लागली तर नेटवर्क नसल्याने तीही वेळेत मिळत नाही. पावसाळ्यामुळे साप, विंचू, नैसर्गिक आपत्ती अशा घटना घडत असतात. अशावेळी प्रशासनाला सम्पर्क साधण्यासाठी मोबाईल सेवा कामी येते. याबाबत कंपनीने व अधिकाऱ्यांनी हे टॉवर दुरुस्त न केल्यास मोर्चा काढण्याच्या तयारीत ग्राहक आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 31/Jul/2025