जावयाने सासऱ्याला बांबूने मारहाण केली; देवरुखमध्ये कौटुंबिक वादातून हाणामारी

देवरुख, ३० जुलै : संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी-सुर्वेवाडी येथे एका कौटुंबिक वादातून जावयाने आपल्या सासऱ्याला बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बँक कर्जाच्या हप्त्यावरून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीत झाले. यात सासरे रविंद्र पांडुरंग मोहिते (वय ५५, रा. तुळसणी, बौद्धवाडी) हे जखमी झाले असून, याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास तुळसणी-सुर्वेवाडी येथे घडली. फिर्यादी रविंद्र पांडुरंग मोहिते आणि आरोपी जगदिश अरविंद सुर्वे (वय ४२, रा. तुळसणी, सुर्वेवाडी) हे दोघे नात्याने सासरे आणि जावई आहेत.

प्रकरण असे की, फिर्यादीच्या पत्नीने ग्रामीण कोठा बँकेतून १ लाख १४ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यातील काही रक्कम रविंद्र मोहिते यांनी आपला मुलगा रणजित आणि मुलगी ज्योती यांना अर्धी-अर्धी दिली होती. या कर्जाचा हप्ता मुलगा रणजित भरत होता, मात्र मुलगी ज्योती हप्ता भरत नव्हती. त्यामुळे बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी येत होते.

याच कारणावरून विचारणा करण्यासाठी फिर्यादी रविंद्र मोहिते आणि त्यांचा पुतण्या सचिन कृष्णा कांबळे हे मुलगी ज्योती हिच्या घरी गेले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या जावई जगदिश सुर्वे याला याचा राग आला. रागाच्या भरात त्याने रविंद्र मोहिते यांना शिवीगाळ केली आणि जवळील बांबूने त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांना व डोक्याला मारहाण केली. या मारहाणीत रविंद्र मोहिते जखमी झाले.

या घटनेनंतर रविंद्र मोहिते यांनी तात्काळ देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून, ३० जुलै २०२५ रोजी पहाटे १.२६ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८५/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८ (१) आणि ३५२ नुसार आरोपी जगदिश अरविंद सुर्वे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुख पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 31-07-2025