काँग्रेसच्या उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी सोनललक्ष्मी घाग यांची नियुक्ती

रत्नागिरी : काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या सोनललक्ष्मी घाग यांची उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश न आल्याने पक्षाने मोठे फेरबदल केले आहेत. जिल्ह्यासाठी काँग्रेसने देखील आता उत्तर व दक्षिण असे दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत.

काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाने पुनर्बाधणी करून तरुण व नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. श्रीमती घाग यांनी प्रदेश उपाध्यक्ष पदावर काम केले आहे. त्यांच्या या कामाची पोचपावती म्हणून त्यांची उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे रत्नागिरीत सोनललक्ष्मी घाग काँग्रेसला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या हेतूने सोनललक्ष्मी घाग यांची निवड करण्यात आली असल्याचे बोलले जात आह. या निवडीबद्दल बोलताना श्रीमती घाग म्हणाल्या की काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्व जाती-धर्माच्या लोकांना घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो आपण सार्थक लावण्याचा प्रयत्न करणार आहे व पक्ष
वाढवण्यासाठी तळागाळापर्यंत पोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेस उत्तर रत्नागिरीत ताकद दाखवून देईल, असे सांगण्यात आले.

प्रथमच महिलेला जिल्हाध्यक्षपद
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला बेसिक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. याआधी काँग्रेस जिल्हाध्यक्षपद अविनाश लाड यांच्याकडे होते. गेली अनेक वर्षे रमेश कीर यांनी हे पद भूषविले होते. अविनाश लाड यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हे पद अनेक दिवस रिक्त होते. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातून या पदासाठी फार कोणी इच्छा व्यक्त केली नव्हती. अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रथमच एका महिलेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद दिले आहे. चिपळूण, खेड, गुहागर, मंडणगड, दापोली या तालुक्यांची त्यांच्यावर जबाबदारी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 31/Jul/2025