मुंबई, ३१ जुलै : रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद दिवस ठरला! रत्नागिरी जिल्हा परिषद आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या प्राथमिक शाळांतील २० हुशार विद्यार्थ्यांची ‘USA – NASA Study Tour 2025’ साठी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी आज मुंबई येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम देशात प्रथमच जिल्हा परिषदेच्या शाळांमधून इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ‘नासा’च्या अभ्यासदौऱ्यासाठी पाठवला जात असल्यामुळे, हे रत्नागिरीसाठी अत्यंत गौरवाचे आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी क्षण असल्याचे सामंत यांनी यावेळी नमूद केले.
मा. ना. उदय सामंत म्हणाले, “विज्ञान आणि संशोधनाच्या वाटचालीत उडी घेणाऱ्या या नव्या पिढीचे हे पहिले पाऊल त्यांना एक नवी दिशा देईल, असा मला विश्वास वाटतो. शिक्षण, जिद्द आणि स्वप्नांच्या बळावर रत्नागिरीच्या मातीतून थेट नासापर्यंतचा प्रवास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.”
या निवडक २० विद्यार्थ्यांना अमेरिकेतील ‘नासा’ (NASA) येथे अभ्यासदौरा करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे त्यांना जागतिक दर्जाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान जवळून अनुभवता येईल, ज्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळेल. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचे नवे दालन उघडले गेले आहे, असे बोलले जात आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उंचावले असून, इतर विद्यार्थ्यांनाही यातून प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 31-07-2025













