रत्नागिरी, ३१ जुलै : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र रत्नागिरीतील आंदोलन करणाऱ्या महिलांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शिष्टमंडळ त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा
भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी तातडीने संपर्क मंत्री मा. नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला. मा. राणे यांनी या प्रकरणी त्वरित दखल घेत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार व थेट चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली असून, “हा राज्याचा प्रश्न असून तो कॅबिनेटमध्ये मांडून तोडगा काढला जाईल,” अशी ग्वाही दिल्याचे सौ. ढेकणे यांनी सांगितले.
भाजपचे भक्कम आश्वासन
सौ. वर्षा ढेकणे यांनी आंदोलनकर्त्या महिलांना आश्वासन दिले की, “भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. तुमच्या मागण्यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही आणि सरकार म्हणून आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो.”
या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण तसेच बंदर व मत्स्यउद्योग मंत्री मा. नितेश राणे यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही सौ. वर्षा ढेकणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे, मध्य मंडल अध्यक्ष प्रतिक देसाई, बाबू सुर्वे, निलेश आखाडे, रामदास शेलटकर, आणि अनुष्का शेलार आदी उपस्थित होते. माविमच्या महिलांच्या प्रश्नावर सरकार सकारात्मक तोडगा काढेल, अशी आशा या भेटीमुळे निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 31-07-2025













