अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बैलाचा मृत्यू, वासरू जखमी

रत्नागिरी, ३० जुलै : रत्नागिरी-पावस मार्गावरील फणसोप सडा परिसरात एका अज्ञात वाहनाने रस्त्यावर असलेल्या दोन जनावरांना जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या अपघातात एक बैल जागीच मयत झाला असून, एक पाडी (वासरू) गंभीर जखमी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात करणारा चालक कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मोटार परिवहन कायदा आणि भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी अर्चना पांडुरंग मगदम (मपोकों / १७०) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ जुलै ते २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, मात्र नक्की वेळ स्पष्ट नाही, रत्नागिरी-पावस रस्त्यावरील फणसोप सडा या ठिकाणी घडली. कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने अत्यंत निष्काळजीपणे आणि बेदरकारीने वाहन चालवून रस्त्यावर असलेल्या दोन निरपराध जनावरांना धडक दिली. यात एका बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक पाडी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेली आढळून आली.

अपघात घडवल्यानंतर संबंधित अज्ञात वाहन चालकाने कायद्यानुसार अपघाताची माहिती पोलिसांना न देता किंवा जखमी जनावरांना कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता घटनास्थळावरून पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच, रत्नागिरी शहर पोलिसांनी तातडीने दखल घेतली. ३० जुलै रोजी दुपारी ३.४४ वाजता या प्रकरणी गु.र.नं. ३३४/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२५ (जनावरास विकलांग करणे), २८१ (सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करणे) सह मोटार परिवहन कायदा कलम १८४ (बेदरकारपणे वाहन चालवणे) आणि १३४(ब)/१७७ (अपघातानंतर मदत न करणे व माहिती न देणे) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी पाडीवर स्थानिक प्रशासनाच्या मदतीने उपचार केले जात आहेत. रत्नागिरी शहर पोलीस अज्ञात आरोपी आणि वाहनाचा शोध घेत आहेत. अशा घटनांमुळे रस्त्यावरील जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 31-07-2025