देवळेकर सिस्टर्सचा नेमबाजीत डंका! राष्ट्रीय स्तरावर रौप्य-कांस्यपदक पटकावले

रत्नागिरी, ३१ जुलै : पुणे येथील बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या २८ व्या कॅप्टन इजिकल शूटिंग चॅम्पियनशिप शॉटगन स्पर्धेत रत्नागिरीच्या देवळेकर भगिनींनी जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. वरा मानस देवळेकर हिने ज्युनियर डबल ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्यपदक पटकावले, तर तिची बहीण कार्तिकी मानस देवळेकर हिने कांस्यपदक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. ही स्पर्धा २६ ते २८ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती.

याच स्पर्धेत रत्नागिरीच्या मैत्री मनोज साळवी हिनेही लक्षवेधी कामगिरी करत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. या तिन्ही गुणवंत नेमबाज खेळाडूंची प्री-नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्या महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या तिघींनाही बालेवाडी रेंजचे प्रशिक्षक सिद्धार्थ पवार यांनी कसून प्रशिक्षण दिले आहे, तर हेमंत बालवडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल सिद्धांत रायफल क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव आणि राष्ट्रीय नेमबाज किसन खारके, सदस्य अलंकार कोळी, तसेच प्रसिद्ध उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच, आगामी प्री-नॅशनल स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरीच्या या लेकींनी नेमबाजीमध्ये मिळवलेल्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यातील इतर नवोदित खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 31-07-2025