सावर्डे : संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील आरवली येथील चारपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामात मुख्य मार्गावर पुलाच्या मध्यभागी सुमारे दहा मीटर लांबीचा सखल भाग तयार करण्यात आला आहे. वेगात असलेल्या वाहनचालकांना अचानक सखल भागाचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वाहनधारकांकडून बांधकाम विभागाच्या या ढिसाळ कारभाराबाबत कमालीची नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या आरवली ते चिपळूणदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. महामार्ग चारपदरी असल्याने सर्वच वाहने सुसाट वेगाने धावत असतात. आरवली येथे उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही त्यामध्ये काही ठिकाणी नियोजनाच्या कमतरता स्पष्टपणे जाणवत आहेत. विशेषतः पुलाच्या मध्यभागी अंदाजे १० मीटर लांबीचा मूळ रस्त्याच्या उंचीपेक्षा सखल भाग तयार केला आहे.
उड्डाणपुलावर सुसाट वाहने आले असता अचानक सखल भाग येतो. सखल भाग पाहता वाहनचालकांना सुस्पष्ट सूचना किंवा मार्गदर्शक फलक नसल्याने गाडीचा वेग योग्य पद्धतीने नियंत्रित करता येत नाही. अचानक ब्रेक लावल्याने वाहने जोरात आदळतात. रात्रीच्यावेळेस किंवा पावसाळ्यात हे अधिकच धोकादायक ठरू शकते. स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा तक्रार केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 31/Jul/2025














