रत्नागिरी, ३० जुलै : रत्नागिरी तालुक्यातील गोळप-धनगरवाडी येथे कामाला असलेल्या एका परप्रांतीय मजुराने दारूच्या नशेत कीटकनाशक प्राशन केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. २९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्याला उपचारासाठी रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीचे नाव मनोज थापा असे असून, त्याचे पूर्ण नाव व पत्ता अद्याप अज्ञात आहे. तो गेल्या एक महिन्यापासून गोळप-धनगरवाडी येथील रमाकांत बबन जांगळी (वय ४९) यांच्या आंब्याच्या बागेत कामाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मनोज थापा दारूच्या नशेत रमाकांत जांगळी यांच्या घरी आला. यावेळी त्याने रमाकांत जांगळी यांना सांगितले की, “मी दारू पिऊन कीटकनाशकाचे विष प्यायलो आहे.” असे बोलून त्याने तिथेच उलटी केली. रमाकांत जांगळी यांना विषारी औषधाचा वास आल्याने त्यांनी तात्काळ मनोज थापाला आपल्या खाजगी गाडीतून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
सिव्हिल हॉस्पिटलच्या आय.सी.यू. विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात ३० जुलै २०२५ रोजी दुपारी ४.५५ वाजता आमृ. क्रमांक १८/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 31-07-2025













