कशेडी घाटातील जुन्या महामार्गावर भोगावच्या हद्दीत रस्ता खचला

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावच्या हद्दीत २००५च्या अतिवृष्टीमध्ये खचलेला रस्ता सालाबादप्रमाणे यंदाही खचला असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

जुन्या महामार्गावरील कशेडी घाटपरिसरात २६ गावांचा समावेश असून, सद्यः स्थितीत वाहतूक बोगदामार्गे सुरू आहे; मात्र कशेडी घाटातील जुना महामार्ग हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, सद्यःस्थितीत हा रस्ता सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि ४ फुटांपेक्षा जास्त खोल खचला असून, सर्वत्र तडे गेल्याचे दिसून येत आहेत. रस्ता पुन्हा खचल्यास या मार्गावरील एसटी सेवा बंद होऊन याचा त्रास या परिसरातील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

२००५ च्या झालेल्या अतिवृष्टीमध्ये कशेडी घाटातील भोगाव हद्दीत दरडी कोसळून महामार्ग खचला होता. या मार्गावर गेली २० वर्षे तात्पुरती मलमपट्टी करून शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे; मात्र गेल्या २० वर्षातही या ठिकाणी कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाळ्यात प्रत्येक वर्षों रस्ता खचण्याचे ग्रहण येथे कायम आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जनतेला हा वनवास कायम सहन करावा लागतो. संबंधित महामार्ग प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली.

गेल्या २० वर्षांत या रस्त्याची पाहणी करण्यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार अशा सर्व नेतेमंडळींनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले; मात्र आजपर्यंत या ठिकाणी ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळे या पंचक्रोशीतील जनतेकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, गणपती सणापूर्वी रस्ता दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 31/Jul/2025