राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथे कांदळवन कक्षातर्फे बचतगटाच्या महिलांना उद्योग व्यवसायातून रोजगारनिर्मिती करणाऱ्या शिंदाणे पालन, खेकडेपालन, कालवे निर्मिती, शोभिवंत मासेनिर्मिती व मूल्यवर्धित पदार्थनिर्मिती आदी विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली. या प्रकल्पांसाठी शासनामार्फत अनुदान दिले जात असून, त्याचा लाभ घेऊन बचतगटाच्या महिलांनी स्वतःसह कुटुंबाची आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन कांदळवन कक्षाच्या प्रिया कांबळे यांनी केले.
शासनाच्या वनविभागातील कांदळवन कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक आणि रोजगाराभिमुख योजनांबाबत माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी तालुक्यातील जैतापूर ग्रामपंचायत येथे महिला बचतगटांसाठी नुकतेच विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कांदळवन कक्षाच्या कांबळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कांदळवन कक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देताना या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महिला बचतगटांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या वेळी महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी, प्रशिक्षणाची प्रक्रिया, अर्जपद्धती आणि आवश्यक कागदपत्रांची माहितीही सविस्तरपणे देण्यात आली. या वेळी सरपंच राऊत, लाड यांनीही शासनाच्या योजनांचा लाभ घेत स्वयंरोजगार निर्मिती करण्याचे आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 31/Jul/2025














